अवघ्या नऊशे ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश

0

सातारा : साडेसात महिन्यांत जन्माला आलेल्या अवघ्या नऊशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपचारांमुळे जीवदान मिळाले आहे.
आपुलकी व तत्परतेच्या सेवेमुळे त्या बालकाच्या मातेसह संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

जिल्हा रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामध्ये शासनाच्या माता व बालमृत्यू प्रमाण रोखण्याचा एक महत्त्‍वाच्या उपक्रम आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रसूती व नवजात बालकांच्या उपचारांकडे जिल्हा रुग्णालयात विशेष लक्ष दिले जाते.

खासगी रुग्णालयात सध्या प्रसूती व नवजात बालकांच्या उपचारासाठी मोठा खर्च होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रसूती शस्त्रक्रिया होतात. परिणामी, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या व प्रसूती झालेल्या अशा सर्व महिलांची संख्या अनेकदा वाढलेली असते.

नवजातांच्या उपचाराचे आवाहन

योग्य दिवस न भरता जन्माला आलेल्या बालकांची पुरेशी वाढ झालेली नसते. त्यामुळे शरीरातील अवयवांची पूर्ण वाढ किंवा त्यांची ताकदही कमी असते. या बाळांची प्रतिकारशक्ती, त्याचे वजन तसेच खुल्या वातावरणात टिकाव धरण्याची त्याची प्रतिकार क्षमताही नसते. त्यामुळे या बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या योग्य उपचाराचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असते.

दिवसाला हजारोंचा खर्च

कमी वजनाच्या बालकांना उपचारासाठी नवजात बालकांच्या विशेष अतिदक्षता विभागाची आवश्यकता असते. त्यामध्ये गर्भाशयाप्रमाणेच कृत्रिम वातावरण राखणाऱ्या वॉर्मरची गरज असते. खासगी रुग्णालयांमध्ये या वॉर्मरमध्ये ठेवण्याचा खर्चच दिवसाला हजारो रुपयांचा होतो. औषधे व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा खर्च वेगळाच असतो. त्यामुळे नवजात बालकाच्या उपचारासाठी पालकांना दरदिवशी हजारो रुपये मोजावे लागतात.

जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार

खासगी रुग्णालयातील हा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसूती वॉर्डनजीकच नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आले आहे. जन्मत: गंभीर परिस्‍थिती असलेल्या किंवा कावीळ झालेल्या बालकांना या वॉर्डमध्ये ठेवले जाते.

या वॉर्डमध्ये नवजात बालकांना वॉर्मरमध्ये ठेऊन उपचार केले जातात. जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या मार्फत या मुलांवर उपचार केले जातात. तेथील इतर स्टाफही प्रशिक्षित आहे. हे सर्व उपचार जिल्हा रुग्णालयात मोफत होत असतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांचेही या विभागाकडे गांभीर्याने लक्ष असते.

मातेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले

जिल्हा रुग्णालयातील एका मातेला अवघे नऊशे ग्रॅमचे मूल झाले. जन्मतः त्याची प्रकृती नाजूक होती; परंतु जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. शार्दूल कणसे व अन्य कर्मचाऱ्यांच्या टीमने अत्यंत आपुलकीने व तत्परतेने या बालकावर उपचार केले. त्यामुळे सुस्थितीत आलेल्या या बालकाला नुकतेच घरी सोडण्यात आले. त्या वेळी त्या बाळाच्या मातेसह उपचारात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here