देशात फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ; अँटिबायोटिक न घेण्याचा आमचा सल्ला

0

देशात काही दिवसांत फ्लूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

या आजारामध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा दुखणे, ताप, अंगुखी आणि डायरिया यांच्यासारखी लक्षणे आढळून येत आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे.

नागरिकांनी वरील लक्षणे आढळली तरी घाबरून न जाता काळजी घ्यावी. पण, यादरम्यान अँटिबायोटिक्सचं सेवन मात्र टाळावं, अशी सूचना IMA च्या या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे.IMA च्या पत्रकानुसार, ही लक्षणे पाच ते सात दिवस दिसू शकतात. ताप असल्यास तो तीन दिवसात बरा होतो. पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो. NCDC च्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ही ‘H3N2’ या विषाणूमुळे होत आहेत.

साधारणपणे, ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान फ्लूसदृश लक्षणं आढळून येणं, ही सामान्य बाब मानली जाते. 15 वर्षांखालील बालके आणि 50 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक यांच्यात ही लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येतात. या काळात नागरिकांना नाक-घसा संबंधित संसर्ग होऊ शकतात. किंवा काही प्रमाणात तापही येतो. या सगळ्यांमध्ये वायू प्रदूषणाचीही काही प्रमाणात भूमिका असते.

पण, ही लक्षणे रुग्णांना आढळून येत असल्यास त्यावर केवळ लक्षणांनुरूप उपचार घ्यावेत, अँटिबायोटिक्स घेऊ नयेत, अशी सूचना IMA ने केली आहे.

अशी लक्षणे आढळल्यास लोक अझिथ्रोमायसीन, अमोक्सिक्लॅव्ह यांच्यासारखी औषधे प्रमाण किंवा वेळ यांचा कोणताही विचार न करता घेतात. एकदा का बरं वाटू लागलं की तत्काळ ती औषधे घेणं थांबवतात.

अमॉक्सिसिलिन, नॉरफ्लॉक्सेसिन, ऑप्रोफ्लॉक्सेसिन आणि लेव्होफ्लॉक्सेसिन या प्रतिजैविकांचा सर्वाधिक गैरवापर होतो. अतिसार आणि मूत्रमार्गाला होणाऱ्या संसर्गासाठी ती घेण्यात येतात. पण, शरीरात अँटिबायोटिक रेझिस्टन्स तयार होऊ नये, यासाठी सरसकट अशी औषधे घेण्याची सवय बदलावी लागेल, असं IMA ने म्हटलं. उदा. डायरियाच्या 70 टक्के प्रकरणांमध्ये अँटिबायोटिक्स गरजेची नसतात. पण डॉक्टर त्यांचा वापर उपचारासाठी करतात.

अझिथ्रोमायसीनचा वापर कोव्हिड काळात बेसुमार प्रमाणात झाला, यामुळेही शरीरात रेझिस्टन्स निर्माण झालं आहे, असं IMA सांगितलं.

त्यामुळे, अँटिबायोटिक्स घेत असताना आपल्याला झालेला संसर्ग हा बॅक्टेरियामुळे झालेला आहे किंवा नाही, याचं निदान करावं असं IMA ने म्हटलं.

नव्या फ्लूची लक्षणे काय आहेत?

  • सर्दी, खोकला आणि काही प्रमाणात ताप.
  • मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, डायरिया (अतिसार).
  • ताप 3 दिवस राहतो.
  • खोकला 3 आठवडे राहू शकतो.

काय करावं?

IMA च्या सूचनेनुसार, पुढील काही दिवसांत खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. –

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रतिजैवके आणि इतर औषधे घ्यावीत.
  • स्वत:हून औषधे घेऊ नयेत.
  • हस्तांदोलन करू नये, स्पर्श टाळावा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
  • हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत.
  • मास्कचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here