कराड : खुनासह तेरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कऱ्हाड शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील टोळीवर मोक्का कायद्याखाली न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याच्या प्रस्तावाला पोलीस महासंचालकांकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले आहे. आरोपींमध्ये हजारमाची, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सदस्याचा समावेश आहे.
टोळीप्रमुख सोम्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ अण्णा अधिकराव सुर्यवंशी, रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी (तिघेही रा. हजारमाची) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाचीचा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सोमा उर्फ सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर कऱ्हाड शहर व पुणे पोलीस ठाण्यात वैयक्तिक तसेच टोळीने केलेल्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातच गतवर्षी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.
या टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्याची पूर्वपरवानगी मिळण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाला १० जून रोजी मंजुरी देण्यात आली असून तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कोंडीराम पाटील, प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक संदीप शितोळे, अमित बाबर, अनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, सागर बर्गे, दीपक कोळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.