शेजारीच निघाला पक्का वैरी ; दागिन्यासाठी केला वृद्ध महिलेचा खून !

0

अवघ्या काही तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, पोलिस पथकाचे कौतुक.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका ऊसाच्या शेतात काल दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी सुमन विटनोर या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात राहुरी पोलिस पथकाने महिलेचा खूण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले.  राहुरी तालुक्यातील राहुरी, मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये काल दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान सुमन सावळेरराम विटनोर, रा. मांजरी, या ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.

           

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेरराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या उशीरा पर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता. काल दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेरराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागीने ओरबडून घेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुरज गायकवाड, अशोक शिंदे, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक फुंदे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले. त्यानंतर पोलिस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला. 

     

 दरम्यान पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदिप ऊर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका ऊसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागीने काढून घेतले. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. काल दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलिस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केले.

         आरोपी संदिप ऊर्फ संजू अशोक चोपडे, वय ३५ वर्षे, रा. मळहद्द, मांजरी, ता. राहुरी याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९२१/२०२४ भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम १०३ (१), ३११ प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला आज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गजाआड करुन गुन्ह्यातील उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here