पैठण,दिं..(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावाजवळ येणाऱ्या स्थलांतरित शासनमान्य देशी दारू दुकानास नागरीकासह युवक, ग्रामस्थांचा विरोध झाला असून याबाबत जिल्हाधिकारी ,राज्य उत्पादन शुल्क विभाग छत्रपती संभाजीनगर यांना सोमवार (दिं.१२) रोजी एका लेखी निवेदनाद्वारे येणाऱ्या दुकानास विरोध दर्शविण्यात आलेला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत ईसारवाडी ता.पैठण येथील आयोजित केलेल्या ग्रामसभेत दिं.३१/८/२०२२ रोजी ठराव क्रमांक- २ पारीत करून ग्रामपंचायत हद्दी मध्ये ईसारवाडी गाव हे आदर्श गाव असल्यामुळे शासनमान्य कोणत्याही देशी विदेशी दारू दुकानास मान्यता देण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा ग्रामस्थानी ग्रामसभेत ठराव पारीत करून देशी विदेशी दारूच्या नवीन दुकानास ग्रामपंचायती कडून यापुढे कोणतीही मान्यता किंवा ना हरकत देण्यात येणार नाही असे ग्रामस्थांनी सर्वानुमते ठरवून तसा ठराव सन २०२२ मध्ये पारीत केलेला आहे परंतु तरीही ग्रामपंचायत ईसारवाडी कडून देशी दारूच्या स्थलांतरित दुकानास ग्रामपंचायत हद्दीत सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू आहे तसेच ग्रामपंचायतीने २०२२ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही नवीन देशी विदेशी दारू दुकानास सुरू करण्याची मान्यता देण्यात येऊ नये असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
असे दुकान गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याचा परीणाम गावातील लोकांवर होऊन गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन अनेक संसार उद्धवस्त होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातील मुद्यांचा सविस्तर विचार करून जिल्हाधिकारी , राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी ग्रामपंचायती कडून सन २०२२ मध्ये ग्रामस्थांनी सर्वानुमते पारीत केलेल्या ठरावाचा विचार करून कोणत्याही शासनमान्य दारू दुकानास मान्यता देऊ नये अशी मागणी त्यांच्या निवेदनात केलेली असून त्यांनी दिलेल्या निवेदनावर प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे ईसारवाडी येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे सदरील निवेदन कृष्णा पाटणकर व अतीष माने यांनी सादर केलेले आहे.
———
ग्रामपंचायत ईसारवाडी येथील ग्रामस्थांनी सन २०२२ मध्येच कोणत्याही नवीन देशी विदेशी दारू दुकानास परवानगी न देण्याचा ठराव सर्वानुमते ग्रामसभेत पारीत केलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी त्या ठरावाचा विचार करता कोणत्याही नवीन दुकानास मान्यता देऊ नये अन्यथा त्या विरुद्ध तिव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहे.
———–
कृष्णा पाटणकर (ग्रामस्थ) : आम्ही कोणत्याही देशी विदेशी दारू दुकानास मान्यता न देण्याचा ठराव सन २०२२ मध्ये सर्वानुमते ग्रामसभेत पारीत केलेला असल्याने कोणत्याही नवीन देशी विदेशी दारूच्या दुकानास प्रशासनाने मान्यता देऊ नये नसता आम्हाला या विरूद्ध जन आंदोलन उभे करावे लागेल त्यामुळे आमच्या निवेदनाचा विचार करून शासनाने स्थलांतरित होत असलेल्या दुकानास ग्रामपंचायत हद्दीत सुरू करण्यास मान्यता देऊ नये.