मलवडी : माण तालुक्यातील मलवडी येथे टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात आकाश दशरथ मगर हा तरुण गंभीर जखमी झाला. तसेच टोळक्याने एका ओमिनीची प्रचंड नासधूस केली आहे.
याबाबतची माहिती अशी, मलवडीतील आकाश दशरथ मगर व सत्रेवाडी येथील प्रवीण अशोक सत्रे यांची महिन्याभरापूर्वी बसस्थानक परिसरात वाहन लावण्यावरुन बाचाबाची झाली होती. संबंधित प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र, या घटनेचा राग प्रवीण सत्रे याच्या मनात धुमसत होता. हा राग मनात धरुन सोमवार १० जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या प्रवीण याने दुचाकींवरून आलेल्या आपल्या साथीदारांसह बसस्थानक परिसरात ओमिनी गाडीत बसलेल्या आकाश मगर याच्यावर लाकडी दांडकी, दगड यांच्यासह लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला.
या हल्ल्यात सुरुवातीला ओमिनी गाडीच्या सर्व काचा फोडून टाकल्या. नंतर आकाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आकाशच्या डोक्याला मार बसून गंभीर दुखापत झाली. यावेळी आकाशच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी लंपास झाली. हल्ला करुन पाच ते दहा मिनिटांत मारहाण करणारे आपापल्या गाड्या घेवून पसार झाले. बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेची माहिती मिळताच दोनशे ते तीनशे ग्रामस्थांचा जमाव बसस्थानक परिसरात जमला होता.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी आरोपी प्रवीण अशोक सत्रे, अनिकेत त्रंबक सावंत, नकुल संजय जाधव, ज्ञानेश्वर अशोक सत्रे, अशोक जगन्नाथ सत्रे व एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले.
गंभीर जखमी आकाश मगर यास दहिवडीत उपचार करण्यात आले. आकाशने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पाच आरोपींना दहिवडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. या घटनेचा अधिक तपास प्रकाश हांगे करत आहेत.