इस्राईलचा मात्र रुग्णालयावर हल्ल्याचा इन्कार
तेल अविव : गाझातील रुग्णालयावर इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ५०० ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इस्राईलने मात्र रुग्णालयावर हल्ल्याचा इन्कार केला आहे . आयडीएफने ट्विटरवर एक निवेदन जारी केलं आहे. “त्यांचं मत आहे की अल अहली हॉस्पिटलमध्ये झालेला हल्ला पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी डागलेल्या रॉकेटचा परिणाम आहे.”
गाझामध्ये हमास प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला युद्ध गुन्हा म्हटलं आहे. एका निवेदनात ते म्हणतात, “हॉस्पिटलमध्ये शेकडो आजारी, जखमी आणि इस्रायली हल्ल्यानंतर बेघर झालेले लोक उपस्थित होते. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.”
स्थानिक लोकांनी सांगितलं की हॉस्पिटलच्या एका हॉलमध्ये हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आसरा घेतला होता. बीबीसीने तिथल्या एका डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की इथे कमीत कमी 4000 लोकांनी आश्रय घेतला होता. त्यांनी म्हटलं की आतापर्यंत हॉस्पिटलच्या 80 टक्के सेवा बाधित आहेत आणि शेकडो लोक मारले गेलेत किंवा जखमी आहेत. पॅलेस्टिनी प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे.
WHO चे महासंचालक टेड्रोस एडहेनॉम ग्रेबीयॉसिस यांनी हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “WHO या हल्ल्याचा निषेध करत आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार अनेक लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. सामान्य नागरिकांना सुरक्षा आणि सेवा मिळाव्यात अशी आम्ही मागणी करत आहोत.” अल अहली हॉस्पिटलला अँगलिकन चर्चकडून निधी मिळतो. या चर्चच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान 6000 लोकांनी या हॉस्पिटलमध्ये आसरा घेतला होता.