नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 62 प्रवासी ठार

0

नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 62 मृतदेह हाती लागल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. येती एअरलाईन्सचं हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा इथे जात होतं. विमान उतरत असताना कोसळलं आणि त्याला आग लागली.

नेपाळी लष्कराचे प्रवक्ते रती कृष्ण प्रसाद भंडारी यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून आतापर्यंत 62 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत . त्यांनी सांगितलं की, “पोखरा विमानतळापासून दीड किलोमीटर अंतरावर सेती नदीजवळ विमान एका खोल दरीत कोसळलं. 120 रेंजर्स आणि सुमारे 180 जवान मदतकार्यासाठी तैनात आहेत. विमानाला आग लागली, ती विझवण्याचे प्रयत्न सुरू केले गेले.”

विमानाने काठमांडूहून सकाळी 10.32 वाजता उड्डाण केलं. सकाळी 10.50 वाजता विमानाशी शेवटचा संपर्क झाला. लँडिंग दरम्यान विमान कोसळलं. नेपाळ लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. अपघातात विमानाचे तुकडे झाल्याचंही नेपाळ लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली असून, आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी रवाना केलं. जुना विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यान रनवेवर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती येती एअरलाईन्सच्या सुदर्शन बारतौली यांनी दिल्याचं ‘काठमांडू पोस्ट’ने म्हटलं आहे. विमान अपघातात सापडलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून तूर्तास विमानतळाहून अन्य विमानांची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.

विमानात 5 भारतीय प्रवासी

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी सांगितलं की, प्रवाशांमध्ये नेपाळमधील 53 आणि भारतातील 5 जणांचा समावेश आहे. याशिवाय रशियाचे चार, कोरियाचे दोन, आयर्लंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचे प्रत्येकी एक प्रवासी होते. बचाव पथक अपघातस्थळी पोहोचल्याचे निरुला यांनी सांगितलं. ते म्हणाले, “आता आम्ही अधिक माहिती गोळा करत आहोत, बचाव कार्य वेगाने सुरू आहे.”

सोशल मीडियावर आलेल्या व्हीडिओत हे विमान दाटीवाटीच्या प्रदेशात अतिशय खालून जात असल्याचं दिसत आहे. त्यानंतर ते विमान फिरुन कोसळताना दिसत आहे. नेपाळ लष्कराचे 200 सैनिक घटनास्थळी कार्यरत असून, अपघातात अडकलेल्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला आहे आणि प्रचंड डेबरिसही दिसत आहे. या विमानात विदेशी नागरिक असल्याचं लक्षात घेऊन हेल्पलाईन क्रमांक देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here