नवी दिल्ली : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभा सभागृहात बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. काल (21 सप्टेंबर) खासदार रमेश बिधुडींनी हे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभा सभागृहात केलं. या वक्तव्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी रमेश बिधुडींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. रमेश बिधुडी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं भाजपची राजकीय कोंडी झालीय.
गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्री लोकसभेत ‘चंद्रयान-3 यश’ या विषयावरील चर्चेदरम्यान बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांना लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर सभागृहात गदारोळ झाला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या सभागृहातील वादग्रस्त विधानाची दखल घेतली असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बिधुडी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मला आशा आहे की मला न्याय मिळेल आणि लोकसभा अध्यक्ष कारवाई करतील. तसं झालं नाही तर मी सभागृह सोडण्याचा विचार करेन.”
दरम्यान, एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की, भाजप खासदार रमेश बिधुडी यांना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.