बऱ्याच काळापासून हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. याआधी रविवारी (9 फेब्रुवारी) संध्याकाळी भाजपचे एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशी चर्चा होती. मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून वांशिक हिंसाचार सुरू आहे, गेल्या काही दिवसांपासून तिथे शांतता असली तरी हिंसेचं सावट कायम आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर राज्यातील हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप लावले गेले आहेत. यापूर्वी, मणिपूरमधील 19 भाजप आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोक्चोम सत्यब्रत सिंह, मंत्री थोंगम विश्वजित सिंह आणि युमनम खेमचंद सिंह यांचा समावेश होता.
9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत बिरेन सिंह यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची विनंती केली होती.
मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयातील बिरेन सिंह यांचे वैयक्तिक सहाय्यक दीपक शिजागुरुमायुम यांनी बीबीसीशी बोलताना राजीनाम्याच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला होता. दीपाक शिजागुरुमायुम म्हणाले, “मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे.”दरम्यान, एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावर मणिपूर विधानसभेचं नियोजित अधिवेशन स्थगित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात काँग्रेस पक्ष भाजप सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता.
एन. बिरेन सिंह 2017 पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेकदा विरोधकांनी बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्यावर हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयश आल्याचा आरोप होत आला आहे. मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये 3 मे 2023 ला संघर्ष सुरू झाला.