सातारा : ‘गार्गी सीडस्’ या अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या मका बियाण्याची विक्री करणार्या दोन दुकानदारांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी साबळेवाडी (ता. सातारा) येथील श्रीकृष्ण कृषी भांडार या कृषी दुकानाचे मालक प्रवीण प्रभाकर पवार व ‘गार्गी सीड्स’ या बोगस कंपनीच्या बेंगलोर ऑफिसमधील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ (वय ३५, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी साबळेवाडी, ता. सातारा येथील प्रवीण पवार यांच्या श्रीकृष्ण कृषी भांडार या दुकानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना दुकानात जी. एस. १५१७ उत्पादन ‘गार्गी सीड्स, बंगळुरू ऑफिस’ असा टॅग असलेले मक्याचे बियाणे सापडले. हे बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता बियाणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय बंगळुरूच्या कंपनीला राज्य बियाणे विक्रीचा परवाना नाही. एवढेच नव्हे तर संबंधित कंपनीही अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यानंतर कृषी अधिकारी धुमाळ यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन साबळेवाडीचा दुकानदार आणि बंगळुरू बोगस कंपनीविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमन कायद्यान्वे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत.