सातारा : अल्पसंख्यांकांच्या हक्कावर गदा येऊ न देण्याची जबाबदारी बहुसंख्यांक समाजावर असते. सहिष्णू आणि निर्मळ वातावरण हे मानवतेच्या विचारासाठी पोषक असल्यामुळे समाजातील प्रत्येक माणसाने जबाबदारीने वर्तन करायला हवे. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व अभ्यासक प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयात सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याणाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला.तेव्हा प्रा.फरांदे मार्गदर्शन करीत होते.
यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे , जिल्हा उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे, प्राचार्य व्ही. आर. गुजले, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव व व्ही. आर. शिंदे, संयोजक सौ. एस. आर. मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे म्हणाले, “सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा अंगीकार विद्यार्थीदशेपासूनच केल्यामुळे एक सक्षम पिढी घडते. देशाचे भवितव्य सहिष्णु विचारांचा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.” उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे म्हणाले, “अल्पसंख्यांकांच्या न्याय हक्का विषयी जागृती गरजेचे असून शालेय जीवनापासून भारतीय नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव महत्त्वाचे आहे.”
यावेळी जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त विद्यालयात आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले होते. सौ. एस. बी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले.व्ही. आर. शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.