सातारा/अनिल वीर :औंध-खटाव धम्म दिक्षेची ६६ वर्ष पूर्ण झाली आहेत.त्या पार्श्वभूमीवर शनिवार दि.औन्ध येथे धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते.अंतिम संस्कारापूर्वी दि. ७ डिसेंबर रोजी मुंबई येथे दादर समुद्र किनाऱ्यावर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दहा लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली.त्यानंतर, ‘मी भारत बौद्धमय करीन.’ हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे अनुयायी दादासाहेब गायकवाड, बी.सी कांबळे, आर.डी.भंडारे, भैयासाहेब(यशवंत)आंबेडकर, खोब्रागडे आदींच्या माध्यमातून देशभर खेडोपाडी धम्मदीक्षा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज बाबासाहेबांचे नातू डॉ.ऍड.भीमराव आंबेडकर हे हाच धम्मरथ जागतिक पातळीवर घेऊन जात आहेत.त्या अनुशंगाने शनिवार दि.२० मे याच दिवशी म्हणजे दि.२० मे १९५७ रोजी खटाव तालुक्यातील औंध येथे दुपारी व खटाव येथे सायंकाळी भदंत आनंद कौशल्यायन आणि आर.डी.भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य समाज बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली होती.उन्हाळी पावसाचा अंदाज न आल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने व जोरदार पावसाने सावलीसाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला होता. मात्र,भर पावसात भिजत उभे राहून हा धम्म दिक्षा समारंभ संपन्न झाला होता.वरुड गावचे लेखक गो.मा. वाघमारे यांच्या, ‘झूंज व झेप’ या पुस्तकात हा हृदयस्पर्शी प्रसंग रेखाटण्यात आलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा खटाव तालुक्याच्यावतीने दि.२० रोजी सकाळी ११ वाजता सामुदायिक वंदना व समाज बांधवांची उपस्थिती लक्षात घेऊन धम्मदिक्षा समारंभ आयोजित केला आहे. किमान खटाव तालुक्यातील समाज बांधवांनी २० मे या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन इतिहासाला उजाळा देऊन धम्मरथाला हातभार लावावा.असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पूर्व सरचिटणीस अविनाश बारसिंग यांनी केले आहे.