आज दिलीप भोसले यांना  इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराचे वितरण 

0

 सातारा/अनिल वीर : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतीशील विचारांचे वारसदार रयत शिक्षण संस्थेचे मानद सचिव इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवार दि. २२ रोजी सायंकाळी ४ वाजता येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात सेवानिवृत्त मुख्य न्यासयाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

      रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे व संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड.दिलावर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रि.डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी दिली. 

     रयत शिक्षण संस्थेत १९५१ ते १९७३ या कालखंडात संस्थेचे मानद सचिव म्हणून ऍड. इस्माईलसाहेब मुल्ला यांनी काम केले होते. सरळमार्गी, नम्र,न्यायी, परखड,साधी राहणी असणारे प्रामाणिक,त्यागी व निस्वार्थी असे सद्गुणी असे व्यक्तिमत्व होते. ते रयत शिक्षण संस्थेतील बुद्धिमान विद्यार्थी, पदाधिकारी,रयतचे आजन्म सेवक,थोर मातृभक्त, होते. आपल्या आयुष्यात त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून प्रभावी काम केले. त्यांचे सेवाभावी त्यागी जीवनाचा समाजाला परिचय व्हावा.त्यांच्या जीवनातून अनेकाना प्रेरणा मिळावी व समाजात सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव व्हावा. या उदात्त हेतूने रयत शिक्षण संस्था, विविध क्षेत्रात सचोटीने व प्रभावी काम करणाऱ्या एका व्यक्तीस दरवर्षी, ‘’इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार ‘’ देऊन सन्मान करीत असते. या वर्षी हा जीवन गौरव पुरस्कार उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांना सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रु.२५ हजार, सन्मानचिन्ह,मानपत्र आदी आहे.तेव्हा सदरच्या कार्यक्रमास रयत सेवक,सातारा शहरातील शिक्षणपेमी व नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रि.डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here