सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व रहिमतपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे.
श्रध्देच्या बाजारातील काळाबाजार म्हणजे अंधश्रध्दा. दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना जेरीस आलेल्या गरीब,भयग्रस्त लोकांना शिकार करणारा भोंदूबाबा, ‘जंगु अब्दुल मुलाणी.” राहणार – अंभेरी (रहिमतपूर),ता. कोरेगाव हे घरी आपल्या अंगी अतींद्रिय शक्ती आहे. असे भासवून दरबार भरवत.हल्ली भर बाजार पेठेत (रहिमतपूर) शोषण व फसवणुक करण्याचे दुकान जोरात सुरू होते.भक्तांच्या प्रचारास बळी पडून घरातील कटकट,भांडणे व अपयश यातून मार्ग काढण्यासाठी बाबाचा बोलबाला ऐकूण सुभाषचंद्र आप्पाजी मदने (रा. रहिमतपूर) हे गेली काही महिने बाबाकडे जात. त्यांनी वेळोवेळी अनेक उपाय सांगितले.उदा. मंतरलेले पाणी, मंतरलेली वाळू ,अंगारा करून पैसे खर्च केले. त्यात इतरांकडून १० हजार घेतो पण तुझ्या गरिबीमुळे ७ हजारात काम करतो.असे सांगून अडीच हजार घेतले. पण, काही फरक नाही म्हणून त्यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे अर्जाद्वारे संपर्क केला. त्यानंतर डॉ. हमीद दाभोलकर व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रयत्नांनी अंनिस कार्यकर्ते व रहिमतपूर पोलिसांनी सापळा रचून भोंदू बाबा असणारा जंगु मुलाणी यास जादूटोणा विरोधी कायद्यानुसार ए.पी.आय. रहिमतपूर के.गणेश यांनी ताब्यात घेतले.सदर कारवाईत शंकर कणसे,डॉ.दिपक माने,भगवान रणदिवे,मधुकर माने,सिताराम चाळके,सिताराम माने व चंद्रहार माने हे अंनिस कार्यकर्ते तसेच तुषार कळंगे,व्ही.आर.खुडे, समस्त पोलीस कर्मचारी यांनी भाग घेतला.असे कोणी बाबा? जवळपास कार्यरत असतील तर अंनिस कार्यकर्ते यांना संपर्क साधावा.असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.