‘किसनवीर’,’खंडाळा’ कारखान्यांना एनसीडीसीकडून 500 कोटीचे कर्ज मंजूर

0

भुईंज : आर्थिक गर्तेत सापडलेल्या भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसनवीर-खंडाळा साखर कारखाना यांना चेअरमन तथा आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांमुळे एनसीडीसीकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याची माहिती उपाध्यक्ष प्रमोश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे
या पत्रकात म्हटले आहे की, भ्रष्ट व नियोजनशून्य कारभारामुळे किसनवीर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला होता. कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना लिलावाच्या प्रक्रियेत जातो की काय, अशी अवस्था होती. शेतकरी व कामगारांच्या हितासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून आमदार मकरंद पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देणारच, असा शब्द त्यांनी शेतकर्‍यांना दिला होता. या दिशेने पहिले पाऊल पडले असून, एनसीडीसीकडून किसनवीरला 350 कोटी, तर किसन वीर-खंडाळा कारखान्यासाठी 150 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे या कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
आधीच्या व्यवस्थापनाने कारखान्यावर विविध उपक्रम राबवले; परंतु त्यातून कोणाचा फायदा झाला, हे सर्वज्ञात आहे. कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला. परिणामी शेतकरी व कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. 2020-21 च्या हंगामात गाळपास आलेल्या उसाची बिले थकीत होती. कामगारांचे 25 महिन्यांचे पगार रखडले होते. कामगारांची पीएफची रक्कम भरली गेली नव्हती. व्यापारी देणी आणि बँकांची देणी थकीत होती. कोणतीही बँक नवीन कर्ज देत नव्हती.
अशातच 2022 मध्ये कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांनी शेतकर्‍यांच्या मदतीने कारखान्यात सत्तांतर घडविले. त्यावेळी विरोधकांना वाटत होते की, कारखाना सुरू होणारच नाही; परंतु मकरंदआबांनी शेतकर्‍यांच्या विश्वासाच्या जोरावर दोन्ही कारखाने सुरू करून, दोन्ही हंगाम यशस्वी केले. आमदार मकरंद पाटील यांनी कारखान्यासाठी मंत्रिपदही नाकारले. त्यावेळी राज्य शासनाने कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मकरंदआबांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने, एनसीडीसीकडून किसन वीरसाठी 350 कोटी, तर खंडाळ्यासाठी 150 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्याचा व्याजदर 9.81 टक्के आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी आठ वर्षांचा असून, हे कर्ज संचालक मंडळाच्या वैयक्तिक हमीवर देण्यात आले आहे. या प्रक्रियेत राज्य शासनाने मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने शासनाचे आभार व्यक्त करत आहे.
महायुती सरकार कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी
शेतकर्‍यांच्या हितासाठी किसन वीर व खंडाळा कारखान्याची सत्ता मिळवली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज असताना कारखान्याचे शिवधनुष्य उचलले; पण यातून मार्ग काढण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे होते. याकरिता आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभे राहिलो. यामुळेच हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद मिळाली. हे कर्ज मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. महायुतीचे सरकार कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे, हे यावरून दिसून येते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here