कोंडवे : कोंडवे (ता. सातारा) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कोंडवे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आदींच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, आठवी एनएमएमएस शिष्यवृत्तीप्राप्त गुणवंत विद्यार्थी व दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माजी उपसरपंच सौ. सुलभा भुजबळ म्हणाल्या, संस्कारक्षम व गुणवंत विद्यार्थी ग्रामीण भागातूनच घडत आहेत. यासाठी पालकांनी शहराकडे धाव न घेता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी पाठवावेत.
गावचे विद्यार्थी मायभूमीतच शिकले पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी अष्टपैलू असून सर्व परीक्षांमध्ये कोंडवे हायस्कूलने उज्वल यश मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य मोहित चोरगे म्हणाले, गरीब होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. गावची शाळा आपली समजून ग्रामपंचायतीने तीन वर्षापासून शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मनापासून प्रयत्न करत आहेत. यामुळे एनएमएमएस शिष्यवृर्तीधारक विद्यार्थी घडत आहेत. दहावीचे विद्यार्थी 90 टक्याच्यापुढे जात आहेत. विद्यालयाचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात सुध्दा चमकले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती मुख्याध्यापिका सौ. मानसी शिंगटे यांनी दिली. सर्व विद्यार्थी संस्कारक्षम व गुणवत्ताधारक बनवण्यास आम्ही कटिबद्ध असून पालकांनी गावच्या माध्यमिक शाळेत पाल्याचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी नामदेव लोहार यांचे भाषण झाले.
एनएमएमएस सारथी गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आर्यन जितेंद्र निबाळकर, अनुष्का संदीप सावंत, सेजल रमेश भोसले, कीर्ती उमेश पवार यांना 4 वर्षात एकूण 1,53,600 रूपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
दहावीत यश मिळवलेल्या श्रावणी संतोष पवार 92 टक्के, साधना महेश निंबाळकर, हर्षद संतोष चोरगे, शुभम प्रवीण शिंगटे, आर्यन अविनाश कुटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जमीर शेख, सुरेखा गायकवाड, सौ. भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. भरत जगताप यांनी प्रास्ताविक केले. सुनंदा इदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत शेटे यांनी आभार मानले.