पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सकाळी पावसानं थोडी उघडझाप केली होती. मात्र, पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला आहे.
कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ७६.५९ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद २२ हजार ६७८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १३२ मिलिमीटर, नवजाला १७० मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कोयना क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळल्याने येथील नद्या तुडूंब भरुन वाहू लागल्या आहेत.