शिये : परीक्षा केंद्रावर घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांबाबत अनेक थक्क करणारे अनुभव पाहावयास मिळत असतानाच, आता खटक्याच्या पेनाला ऐनवेळी बंदी घातल्याने परीक्षार्थीला चक्क रिफीलने पेपर सोडविण्याची वेळ आली.
अमोल जाधव असे या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्याने सांगितले.
कोल्हापूर कसबा बावडा मार्गावरील पंचगंगा नदीपलीकडे असलेल्या शिये परिसरात एका परीक्षा केंद्रावर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातील लिपिकपदाच्या परीक्षा आज पार पडल्या. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये, तर सर्वसामान्यांसाठी एक हजार रुपये फी असलेल्या या परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थी परीक्षा केंद्रात आले होते. परीक्षेसाठी अत्यंत काटेकोर नियम असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना खटक्याच्या पेनास बंदी घालण्यात आली. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना त्या पेनातील रिफीलने पेपर सोडवावा लागला.
पेपर सोडवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थापकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुळात परीक्षा शुल्कातील तफावत एक मोठा अन्याय असताना, चक्क रिफीलने पेपर सोडवावा लागल्याने नाराज झालेल्या अमोल जाधव या विद्यार्थ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.