गुंड प्रवृत्तीच्या टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची अधिवेशनात मागणी

0

सातारा – गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्ह्यातील टोलनाके ताब्यात घेतले असून, केवळ कंपन्यांच्या नावावर टोलनाका घेऊन गुंडांच्या माध्यमातून टोल वसुली केली जात आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील अनेकजण टोलनाक्यावर कार्यरत असून, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा, यासाठी टोल कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिवेशनात केली.
दरम्यान, स्थानिकांना टोलमाफी असतानाही आनेवाडी, तासवडे तसेच पुणे जिल्ह्यातील खेड- शिवापूर टोलनाका येथे स्थानिकांना टोलमाफी दिली जात नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलनाक्यावरील वसुलीच्या संदर्भात सभागृहात आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर कोणत्याही सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत. गर्दीच्या वेळेस वाहनांसाठी टोलनाका व्यवस्थापन त्यांच्या हितासाठी एक वेगळी लेन ठेवतात.
त्या लेनच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा रेकॉर्डवर येत नाही. त्यामुळे एनएचएआयचे रस्ते आहेत, हे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटला जात आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’टोलनाका परिसरातील ठराविक अंतरातील स्थानिकांना टोलमाफी दिली गेली आहे; परंतु त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जात नाही. जिल्ह्यातील तासवडे, आनेवाडी तसेच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाका येथे स्थानिकांना टोलमाफी दिली जात नाही. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी टोलनाक्यावर किती पैसे गोळा केले जातात, याची माहिती पटलावर ठेवली जाईल, तसेच गुन्हे दाखल असलेल्या लोकांवर त्या त्या वेळी पोलिसी कारवाई होत असते, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here