गुरुजींच्या बँकेची वार्षिक सभा वादळी होणार

0

विजय ढालपे दहिवडी: प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा चेअरमन किरण यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. २३) कोडोली येथील मोरया लॉन्स येथे होणार असून ही सभा विविध मुद्द्यांवरुन वादळी होण्याची चिन्हे आहेत.
सत्ताधाऱ्यांना अंतर्गत कुरबुरीचा फटका बसण्याची शक्यता असून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवर घेरण्याची रणनीती शिक्षक संघाचे नेते सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून करण्यात आले आहेत.

प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, अखिल शिक्षक संघाची (दोंदे गट) सध्या शिक्षक बॅंकेत सत्ता आहे. विरोधात सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघाचे संचालक आहेत. शिक्षक बॅंकेत शिक्षक संघाची सत्ता असताना शिक्षक समितीने अनेक प्रकरणे बाहेर काढून सत्ताधाऱ्यांना धारेवर पकडण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळे आता तर सिध्देश्वर पुस्तकेंसारखा लढवय्या नेता विरोधात आहे. त्यामुळे विरोधकांपेक्षा वार्षिक सभेची सत्ताधाऱ्यांनीच धास्ती घेतल्याची चर्चा आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांमध्ये चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीवेळी घडलेल्या घडामोडींमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरबुरी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा उद्रेक वार्षिक सभेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक निकालानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी काही काळ बंद झाल्या होत्या. मात्र,शिक्षक बॅंकेची वार्षिक सभा जसजशी जवळ येऊ लागली तसतसे गुरुजींच्या बॅंकेतील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. विद्यमान चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाने निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप विरोधक व सभासदांमधून होताना दिसत आहे. विरोधी शिक्षक संघ सत्ताधार्‍यांना विविध मुद्यांवर घेरण्याची चिन्हे असून रविवारी होणाऱ्या वार्षिक सभेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. विरोधकांचे आरोप सत्ताधारी कसे धुडकावून लावणार हे वार्षिक सभेतच दिसून येणार आहे.

बळवंत पाटील यांची भूमिका महत्वाची

शिक्षक संघाचे नेते, बॅंकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बॅंकेचा कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. आताही बळवंत पाटील सत्तेत आहेत. मात्र, त्यांना अंधारात ठेवून बॅंकेचा कारभार होत असल्याचा आरोप सभासदांमधून होत आहे. शिक्षकांची बॅंक टिकली पाहिजे, व्याजदर कमी करुन शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बळवंत पाटील यांचे प्रयत्न राहिले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात बॅंकेत अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप विरोधक व सभासदांमधून होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या जोमाने बळवंत पाटील यांनी बॅंकेच्या कारभारात लक्ष देऊन खऱ्या अर्थाने किंगमेकरची भूमिका पार पाडावी, अशी मागणी सभासदांमधून होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here