सातारा/अनिल वीर : चांगला वाचकच चांगला लेखक बनू शकतो.त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लेखक मुकुंद फडके यांनी केले. येथील दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी फडके बोलत होते. यावेळी शिरीष चिटणीस, प्रा.रमणलाल शहा, डॉ. संदीप श्रोत्री,ऍड सीमंतिनी नुलकर आदी उपस्थित होते.
मुकुंद फडके म्हणाले, “ग्रंथसंपदा ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे प्रत्येकाच्या मनातील कल्पनारम्यता आणि विचारक्षमता वाढू शकते.आपण ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत.त्या प्रत्यक्षात कशा असू शकतील ? याचे चित्रण मनातल्या मनात करायची सवय वाचनाच्या निमित्ताने लागू शकते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वाचनाची सवय माणसाला आधार देऊ शकते.” कोणतेही कुटुंब दरमहा इतर गोष्टींवर विशेषतः मोबाईल किंवा टीव्ही रिचार्ज किंवा हॉटेलिंग याच्यावर जेवढा खर्च करते.त्याच्या तुलनेत दरमहा पुस्तके खरेदी करण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याची खंतही यावेळी मुकुंद फडके यांनी बोलून दाखवली.
डॉ संदीप श्रोत्री म्हणाले, “दीपलक्ष्मी पतसंस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सातारमधील अनेक लेखकांनी आपली पुस्तके या प्रदर्शनामध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. या व्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये जी पुस्तके आपली वाचून पूर्ण झाली असतील. ती सुद्धा अशा प्रदर्शनांमध्ये जर कमी किमतीमध्ये विक्रीसाठी किंवा अदलाबदल योजनेसाठी उपलब्ध करून दिली तर त्याचा वाचकांना मोठा फायदा होऊ शकेल.” ऍड.सिमंतिनी नुलकर यांनी सुद्धा या प्रदर्शनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. पुण्यामध्ये ज्या प्रकारे वाचक संस्कृती विकसित होत आहे. त्याच धर्तीवर सातारामध्ये सुद्धा वेगळी वाचक संस्कृती विकसित करण्याचे काम अशा प्रकारची प्रदर्शने करतील. असे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
प्रा. रमणलाल शहा म्हणाले, “प्रत्येकाने दरमहा पुस्तके खरेदी करून स्वतःचे वैयक्तिक ग्रंथालय विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेतील काही ठराविक लँडमार्क पुस्तके तर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असायलाच हवीत. पुस्तके खरेदी करून वाचण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे.” शिरीष चिटणीस यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. विनायक भोसले यांनी आभार मानले.