सातारा/अनिल वीर : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभाग प्रमुख तसेच श्रीमंत मालोजीराजे बँकेचे संचालक प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांना सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि कार्पोरेट व्यवहार मंत्रालय भारत सरकार,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स अंतर्गत देण्यात येणारा,”अकॅडमीक एक्सलन्स अवॉर्ड-2024″ प्रदान करण्यात आला.
दरवर्षी,इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स उच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्लेसमेंट,संशोधन, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक या चार श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर करते. ‘अकॅडमीक एक्सलन्स अवॉर्ड’ हा पुरस्कार अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी,अध्यापन व्यवसायिकांना ओळखण्यासाठी,संशोधन प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांसोबत सहयोग,व्यावसायिक क्रियाकल्पामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग,चांगला शैक्षणिक रेकॉर्ड,त्यांच्या कौशल्यांच्या क्षेत्रातील वाढ आणि यश यासाठी देण्यात येतो.
महाविद्यालयीन अध्यापन, विद्यार्थीधिष्टित नवनवीन उपक्रम तसेच सामाजिक कार्यामध्ये डॉ. पवार सातत्याने क्रियाशील असतात.त्यांनी आतापर्यंत विविध विषयावर महाराष्ट्रभर 2000 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत.ते संशोधन क्षेत्रात आघाडीवर असून आतापर्यंत नॅशनल,इंटरनॅशनल,आयएसएसएन नंबर असणाऱ्या नियतकालिकातून पन्नासहून अधिक शोधनिबंध लिहून प्रकाशित केलेले आहेत. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या असून विविध राज्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात साधन व्यक्ती व अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केलेले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य म्हणून अभ्यासक्रम तयार करण्याचे पाच वर्षे काम केलेले आहे.शिवाजी विद्यापीठांतर्गत पीएच.डी चे गाईड आहेत.अनेक विद्यापीठांत पीएच.डी प्रबंधाचे तज्ञ परीक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (माजी सभापती,विधानपरिषद महाराष्ट्र राज्य),श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर,/प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनीनी अभिनंदन केले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.