सातारा/अनिल वीर : चार दशकांपेक्षा जास्त काळ डॉ. राजेंद्र माने यांनी केलेले लेखन एकनिष्ठ आणि समर्पण भावनेतून केले आहे. कोणत्याही वादापासून दूर राहून त्यांच्यातील संवेदनशील माणूस लेखननिष्ठा जोपासतो. ही बाब देखील उल्लेखनीय आहे. असे मत ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
येथील ज्येष्ट साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गौरव सोहळा डॉ.ढेरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात डॉ. माने यांच्या साहित्यातील विविध पैलूंचा वेध महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार, समीक्षक डॉ. देवानंद सोनटक्के, कवयित्री शिल्पा चिटणीस यांनी घेतला. कार्यक्रमचे आयोजन दीपलक्ष्मी समूह आणि लोकमंगल ग्रुपचे सर्वेसर्वा शिरीष चिटणीस यांनी केले.
डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, “डॉ. राजेंद्र माने आणि माझे अतिशय घरचे, जिव्हाळ्याचे आणि अकृत्रिम संबंध आहेत. त्यांच्या लेखनातून समोर येणारी सर्वसामान्य माणसे, त्यांची सुख-दु:खे याच्याशी वाचक भावनिकरित्या जोडला जातो. म्हणूनच त्यांच्या साहित्याचे मोठे यश आहे. एक उत्तम लेखक आणि एक चांगला माणूस यांचा संगम डॉ. राजेंद्र माने यांच्यामध्ये आहे. त्यांनी यापुढील काळातही उत्तमोत्तम लेखन करावे.”
साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “मराठी साहित्यामध्ये कथेची एक मोठी परंपरा आहे. कथेला कादंबरीइतका मोठा आवाका नसला तरी कथेला लवचिकता मोठी असते. वि. स. खांडेकर, दि. बा. मोकाशी, गौरी देशपांडेंपासून सानिया, भारत सासणे यांच्यापर्यंतच्या मराठी कथाविश्वाचे एक समर्थ वारसदार म्हणून डॉ. राजेंद्र माने यांच्याकडे पाहिले पाहिजे. कथा, कादंबरी, कविता आणि ललित लेखन असा त्यांचा विस्तृत लेखनपट असला तरी त्यांची कथा ही सर्वाधिक वाचनीय आहे. समीक्षेच्या दृष्टीने साहित्याच्या श्रेष्ठतेचे काहीही निकष असले तरी वाचनीयता हा निकषही महत्त्वाचा आहे. त्या निकषावर डॉ. माने यांची कथा एक वेगळा वाचनानंद देत असते.”
प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के म्हणाले, “मराठीमध्ये अस्तंगत होत चाललेल्या अस्सल ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब डॉ. राजेंद्र माने यांच्या लेखनात आढळते. स्त्री-पुरुष नातेसंबंध, त्यातील अधिक बारीक कंगोरे, समाजातल्या उपेक्षितांचे जगणे आणि या सगळ्याशी अतिशय समर्पक भाषिक कौशल्याने वाचकाला बांधून घेणे. हे डॉ. माने यांनी चांगले साधले आहे. साहित्याच्या विविध प्रकारांत त्यांचा संचार लीलया आहे.” सदरच्या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र माने यांचा षष्ट्यब्दीनिमित्त मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, स्वप्नील पोरे यांनी आभार मानले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.