वाई : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या पोटात गाडल्या गेलेल्या गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे तब्बल चोवीस वर्षांनी दर्शन घडले आहे. श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाल्याने नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेदेखील पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. वाई तालुक्यातील धोम व धोम बलकवडी धरणातही यंदा अल्प पाणीसाठा होता. बलकवडी धरणाची निर्मिती १९९५ मध्ये झाली. यावेळी धरणाच्या निर्मितीत योगदान देणारे गोळेगाव, गोळेवाडी हे गाव व गावातील पुरातन मंदिरे धरणात गाडली गेली.
तब्बल चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धरणातील पाण्याने तळ गाठला अन् धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहास पुन्हा दृष्टिक्षेपात पडला. धरणात श्री धुरेश्वर मंदिर व श्री गोकर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी खुले झाले असून, काही इतिहासप्रेमी संस्था तसेच तरुणांकडून या मंदिरांमधील गाळही काढण्यात आला आहे. ही पुरातन मंदिरे नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरली असून, हा इतिहास पाहण्यासाठी नागरिकांची पावले धरणाकडे वळू लागली आहेत.
प्राचीन मंदिराचा हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर सरकारने अशा मंदिरांचे स्थलांतर करून पुरातत्त्व विभागामार्फत त्याने संवर्धन करायला हवे. या वास्तू हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. – रोहित मुंगसे, इतिहास अभ्यासक
वाईतील भटकंती सह्याद्रीची परिवार गेली सहा वर्षे वाई परिसरात संशोधन करत आहे. संस्थेने मागील काही वर्षेच बऱ्याच अज्ञातस्थळांचे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. बलकवडी धरणाच्या पोटात गुडूप झालेला इतिहासही अभ्यासानंतर दृष्टिक्षेपात आणला जाईल. – सौरभ जाधव, सदस्य भटकंती सह्याद्रीची परिवार