पत्नीला गंभीर जखमी करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

0

फलटण : पिंप्रद ता.फलटण येथे देवघरात दिवाबत्ती करीत बसलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने दिव्यावर ढकलले. यात पत्नी ९१ टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर फलटणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवार, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

भानू शंकर पवार (वय ५०, रा.पिंप्रद, ता.फलटण) असे जखमी पत्नीचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, भानू पवार या गुरुवार, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता घरातील देवघरात दिवाबत्ती करीत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती शंकर महादेव पवार (वय ६०) हा तेथे आला. त्याने अचानक पेट्रोलची बाटली पत्नीच्या अंगावर ओतली. त्यानंतर, तिला दिव्यावर ढकलून दिले. साडीने पेट घेतल्याने यात पत्नी भानू पवार ९१ टक्के गंभीररीत्या भाजून जखमी झाल्या. या झटापटीत पती शंकर पवार याच्या हाताला आणि तोंडाला किरकोळ भाजले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी त्यांची सून सायली अमित पवार (वय २०) हिने रविवारी, दि. २६ रोजी दुपारी पावणेचार वाजता फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर, पोलिसांनी शंकर पवारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. सहायक फौजदार तुकाराम सावंत हे अधिक तपास करीत आहेत.

चारित्र्याच्या संशयाचे कारण!

पोलिसांनी सांगितले की, पत्नी भानू ही पतीवर चारित्र्याचा संशय घेत होती. यातून दोघांमध्ये वाद होत होता. हा प्रकार यातूनच घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. नातेवाइकांकडे, तसेच जखमी भानूचा जबाब नोंदविल्यानंतर आणखी यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे तपासी अधिकाऱ्याने सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here