पर्यावरणामधील घटक वाचवणे गरजेचे : रवींद्र खंदारे

0

  सातारा/अनिल वीर : निसर्ग साखळी मधील चिमणी हा मुख्य घटक असून तो लुप्त झाला तर शेती उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल. पर्यावरणामध्ये जे काही घटक आहेत ते मानवाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोगी आहेत. म्हणूनच पर्यावरणामध्ये घटक वाचवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.असे आवाहन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी केले.लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल, एम.आय. डी.सी. कोडोली येथे आयोजित जागतिक चिमणी दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी पर्यावरण प्रेमी डॉ. संदीप श्रोत्री होते.यावेळी प्रसिद्ध शल्य विशारद डॉ. शशिकांत पवार, कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय धुमाळ, गुणकली भोसले, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, संचलिका सौ.शिल्पा चिटणीस,  मुख्याध्यापिका नंदा निकम, ज्योती नलवडे, कल्याण भोसले, अभिजीत वाईकर, शशिकांत जमदाडे, शेग्या गावित आदी मान्यवरांची उपस्थित होती.

  रवींद्र खंदारे म्हणाले,”लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेने पर्यावरण जागृतीसाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. सध्या शहरी भागामध्ये चिमणी पहायला मिळणे दुर्मिळ झालेले आहे. चिमणीचे आपल्याला संवर्धन करायचे आहे. पर्यावरणाविषयी जे ज्ञान मिळतेय ते ज्ञान अध्ययनार्थीनी आई-वडिलांपर्यंत, घरातील लहान-थोरांपर्यंत पोहोचवा.तेव्हा सर्वांनी मिळून पर्यावरणाचे संवर्धन करूया, पुढच्या पिढीला एक चांगला संदेश देऊया.”

   डॉ.संदीप श्रोत्री म्हणाले,”सध्या चिमण्या धोक्यात आलेल्या आहेत. फक्त चिमण्याच नष्ट होत नाहीत तर जगात अनेक जातीचे पक्षी  नष्ट होत आहेत. चिमणीच फक्त धोक्यात आलेली आहे असे नाही तर तुम्ही सुद्धा धोक्यात आलेले आहात. सध्या विकासाच्या नावाखाली आपण सर्व हरवून बसलोय म्हणून चिमण्या नष्ट झाल्या. चिमण्या या किटक नियंत्रक आहेत. चिमण्यांच्या सुमारे २५ जाती आहेत. चीनमध्ये दुष्काळ पडला तेव्हा साडेचार कोटी लोक मृत्युमुखी पडले. याचे कारण त्या ठिकाणी चिमण्यांची कमी झालेली संख्या होती. म्हणूनच चिमणीला मुठभर धान्य द्या, तिला पाणी द्या.”

           शिरीष चिटणीस म्हणाले, “आम्ही घेतलेल्या जागतिक चिमणी दिन या कार्यक्रमाला जिल्ह्यामधून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व शिक्षकांनी चार दिवसांमध्ये चांगला कार्यक्रम आखलेला आहे. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर चिमण्या आपल्या दारामध्ये येत होत्या. मुंबई, दिल्ली, कलकत्ता या मोठ्या शहरांमध्ये होत असलेल्या दूषित हवेमुळे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या पर्यावरणामध्ये मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म पर्यावरणावर निर्माण झालेल्या आहेत. चिमणी ही आपल्या मनामनामध्ये व घराघरांमध्ये रुजलेली आहे. पुढच्या वर्षी आणखी चार दिवस हा चिमणी महोत्सव आपण घेणार आहोत.”

        डॉ.शशिकांत पवार म्हणाले, “लहानपणी आम्ही चिमण्यांच्या सानिध्यात राहायचो. चिमण्या हा पर्यावरणाचा भाग आहे. चिमण्या नष्ट होत चाललेल्या आहेत. निसर्गामध्ये अन्नसाखळी असते, ती साखळी कुठेही तुटली तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो.तेव्हा पर्यावरणाचा  विचार केला पाहिजे. पृथ्वीच्या दोन ध्रुवावरचे बर्फ वितळत चाललेले आहेत. ही जगासमोर धोक्याची घंटा आहे.”

         गुणकली भोसले म्हणाल्या, “सृष्टीमधील सगळी झाडे उपयोगी आहेत. सध्या बांधकामे वाढत चालल्यामुळे पक्ष्यांची घरटी नष्ट होत चाललेली आहेत. २० मार्च २०१० रोजी पहिला चिमणी दिवस साजरा केला गेला. जैवविविधता टिकवण्यासाठी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो.”  स्लाईडशोद्वारे त्यांनी सादरीकरण केले.

                     यावेळी पर्यावरण प्रेमी सुनील भोईटे व अनिरुद्ध जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कारी येथील अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांनी  स्वप्नामध्ये आली होती एक चिऊताई ” या गाण्यावर ईश्वरी मोरे, गौरी अडागळे, वेदिका मोरे व ओवी अडागळे यांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांमध्ये कराड, वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली व सातारा या तालुक्यातील एकूण ३२५ स्पर्धक सहभागी झाले होते.शिवाय, निबंध स्पर्धेमध्ये १२५ स्पर्धक सहभागी झाले होते.

      बसदरच्या कार्यक्रमास उदय जाधव, विजय यादव, काकासो. निकम, गुलाब पठाण, प्रदीप लोहार, संगीता कुंभार, प्रतिभा वाघमोडे, वैशाली वाडीले, यश शिलवंत, भास्कर जाधव, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, सतीश पवार,चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे,कसबे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.आदिती पवार व प्राची पवार यांनी सूत्रसंचालन केले. सौ.शिल्पा चिटणीस यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here