पुसेगाव- नेर एमआयडीसीचे त्या भागातील जमिनीवरील शिक्के उठवण्याचे आश्वासन मागील अधिवेशनात सरकारने दिले होते. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही का झाली नाही, असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला. त्यावर यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार महामंडळामध्ये ठराव करून पुसेगाव-नेर एमआयडीसीचे शिक्के शंभर टक्के उठवले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पुसेगाव-नेर एमआयडीसीचे त्या भागातील जमिनीवरील शिक्के उठवण्याबाबत, दुध दराबाबत, ऊस तोडणी कामगारांच्या सुविधांबाबत, गायरान जमिनीवरील घरे नियमित करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुसेगाव नेर एमआयडीसी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी सांगितले, की शिक्के उठवण्याची प्रक्रिया व्हायला वेळ लागतो. त्यासाठी असलेल्या महामंडळामध्ये चर्चा होते व ठराव होतो. कोणत्या जमिनींना सूट द्यायची, याबाबतचा निकष असतो.
त्यानुसार महामंडळामध्ये ठराव करून यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार त्या भागातील एमआयडीसीचे शिक्के शंभर टक्के उठवले जातील, अशी ग्वाही दिली. गायरान जमिनीवरील घरे नियमित करण्याबाबतच्या सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याबाबतचा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर याबाबतची माहिती तहसिलदारांकडून मागवली असून, गायरान जमिनीवरील घरांना वीज कनेक्शनसह आवश्यक सुविधा द्याव्यात, अशा सूचना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.