अनिल वीर सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. तेच देशाला तारेल.असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केले. येथील नगर वाचनालयाच्या पाठक सभागृहात संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने मंगल खिंवसरा यांना मातोश्री भिमाबाई आंबेडकर २६ वा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तेव्हा खिंवसरा बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते.यावेळी उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे व प्रा. प्रशांत साळवे उपस्थित होते.
मंगल खिंवसरा म्हणाल्या, “बाबासाहेब यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. येथून पुढे कोणत्याही पुरस्काराची मला अपेक्षा नाही. शोषण विरोधी समतेच्या लढ्यात उभे राहण्यासाठी या पुरस्काराने आणखी बळ मिळाले आहे. बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मी शिकले होते. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी मला एक नैतिक शक्ती व वैचारिक अधिष्ठान मिळाले आहे. बाबासाहेबांनी सशक्त अशी ग्रंथसंपदा दिली आहे. त्या पाठीमागे त्यांची पत्नी रमाई यांनी प्रपंचासाठी केलेले प्रचंड कष्ट विसरुन चालणार नाहीत. अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी पुतळाबाई यांच्याही कष्टाचा मागोवा घेण्याची गरज आहे. सर्वांना समानतेची संधी देणारे भारतीय संविधान न लढता आपल्याला मिळाले आहे. पण प्रत्यक्षात स्त्री-पुरुष समानता अस्तित्वात आलेली नाही. अजूनही लडकी लेक, बाई पुरती सुरक्षित नाही. तिला न्याय व माणूसपण मिळवून देण्याची गरज आहे.
संविधान वाचवण्याची तसेच जाती धर्मांधतेच्या विरोधातील चळवळ मोठी करावी लागेल.महिलांचा सहभाग वाढवण्याचे काम झाले पाहिजे.राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाचा पुरस्कार केला. ते स्वीकारण्याची अजूनही आपली मानसिकता दिसत नाही. उलट जातीभेद वाढवण्याचे आणि तरुणांची डोके भडकवण्याचे काम चालू आहे. ते थांबवण्याची गरज आहे.”
प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले, “संविधान जागर करण्याबरोबरच स्पष्ट राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे. सध्या देशात अर्थ व शिक्षण व्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न होत आहेत. नवी पिढी घडवण्याचे काम जाणीवपूर्वक झाले पाहिजे. सामाजिक प्रबोधनाचे काम करणाऱ्या संबोधी प्रतिष्ठानच्या कार्यास आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.” प्रास्ताविक रमेश इंजे यांनी व सूत्रसंचालन प्रा.प्रशांत साळवे यांनी केले. आभार ॲड.हौसेराव धुमाळ यांनी मानले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.