सातारा दि.2 : स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार यादीनिहाय १०० टक्के कुटुंबांपर्यंत पोहचून मतदार जनजागृतीचे कामकाज मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत करावयाचे नियोजित करण्यात आले असून यासाठी जिल्हयात विविध उपक्रम आयोजित करून नागरीकांमध्ये जनजागृती करणे व मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता उपक्रमांचा एक भाग म्हणून ४ मे हा दिवस “मतदार गृहभेट दिवस” म्हणून राबविण्यात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालीका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था व्यापक जनसंपर्क असणाऱ्या विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने यांच्याकडील सर्व अधिकारी, कर्मचारी व अधिनस्त सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दि.४ मे २०२४ रोजी त्यांच्या त्यांच्या नेमून दिलेल्या ठिकाणी किंवा मुख्यालयी किंवा त्यांचे निवासाचे परिसरात गृहभेटी देवून मतदानाविषयी जनजागृतीचे काम करणार आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत निवडणुकीच्या शेवटच्या महत्वाच्या टप्यामध्ये 100 % मतदारांपर्यंत थेट पोहोचून त्यांना मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासापर्यंत मतदानाचे कर्तव्या बजावण्यासाठी गावपातळीवर पुढीलप्रमाणे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात गाव पातळीवर प्रामसेवक / कृषी सहाय्यक हे पथक प्रमुख असणार असून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक इ.सर्व (B.L.O व्यतिरिक्त) यांचा समावेश असणार आहे.
हे पथक ग्रामपंचायतमधील एकूण कुटुंबे व पथकामध्ये असणारे कर्मचारी यांची कुटुंबनिहाय विभागणी करुन प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मतदारांपर्यत पथकातील सदस्य पोहोचणार आहेत. गावातील कुटुंबाची प्रत्यक्ष गृहभेटी या दि.3 मे 2024 ते 7 में 2024 या मतदानाच्या दिवसापर्यंत 3 वेळा (सकाळी 9 वा. दुपारी 2 वा.व सायं 5 वाजता गृहभेटी करुन जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहणार आहेत. तालुकास्तरावर यामध्ये उत्कृष्ठ कामकाज करणाऱ्या क्षेत्रीय गाव पातळीवरील कर्मचाऱ्याची निवड करुन जिल्हास्तरावर कळविण्यात येणार असून निवडणूक कामकाजानंतर त्यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वीप कक्षाकडील अधिकृत डिजीटल मिडीयाव्दारे (Flyers/vedios/jingles इ.) गावातील सोशल मिडीया ग्रुपवर प्रचार प्रसिध्दीही पथक करणार आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन पुरविण्यात आलेली जनजागृतीसाठी माहितीपत्रकेही मतदारांपर्यंत या पथकाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर दिव्यांग जेष्ठ मतदारांना वाहतुक सुविधांबाबत अडचणी असतील तर याबाबतचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही श्रीमती नागराजन यांनी दिली आहे.