मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे उत्कृष्ट नियोजन..
महाबळेश्वर: महाराष्ट्राचे नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सन्मानार्थ “जागर नारीशक्तीचा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे अचूक नियोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात येथील बाळासाहेब ठाकरे चौकात पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील व मुख्य लिपिक आबाजी ढोबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. महाबळेश्वर नगरपालिकेने या कार्यक्रमात स्थानिक महिलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवणारी रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये शहरातील विविध प्रभागातील १० महिलांच्या पथकांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये प्रामुख्याने मंगळागौर, विविधतेतून एकता, हिंदू सन, वारकरी दिंडीचे सादरीकरण केले. यावेळी महिलांच्या उत्कृष्ट अशा ढोल पथकाने महाबळेश्वर वासियांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीमध्ये महाबळेश्वरच्या विविध प्रभागातील महिलांनी भाग घेतला आणि आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले व त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देखील दिला.
संध्याकाळी ७ वाजता येथील पोलीस परेड ग्राउंडवरील कार्यक्रमात महाबळेश्वरमधील सर्व माजी महिला नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा तसेच नगरसेविकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना प्रज्ञा कोळी यांच्या लोकसंगीताचा नजराणा या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सांस्कृतिक व लोक कलेचा अतिशय उत्तम अशा बहारदार कार्यक्रमामुळे महिला वर्गात आनंदाचं उधाण आले असल्याचे चित्र दिसत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी अमित माने, सचिन कदम, मुरलीधर धायगुडे, प्रशांत मस्के, संतोष दड, सुनील भालेराव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल येवले यांनी केले.
आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही : मुख्याधिकारी पाटील
“आज झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या सर्व महिला वर्गाला शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये महाबळेश्वरातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही त्यामुळे त्यांना वर्षभरातून एकदा येणारा महिला दिन हा एक सण असल्याप्रमाणे आनंदाने साजरा करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असून महाबळेश्वर नगरपालिकेने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये शहरातील विविध बचत गटांचे नोंदणीकरण करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्याचा प्रयत्न समाविष्ट आहे. आणि त्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी पालिका सर्वतोपरी सहकार्य करीत आहे.”