महाबळेश्वर : महाबळेश्वर आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी महेश श्रीराम जाधव यांची नियुक्ती झाली आहे. महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांची पदोन्नतीने मुंबई सेंट्रल आगारात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांचे मूळ गाव सांगली असून त्यांची एसटी महामंडळात आगार व्यवस्थापक व सहायक वाहतूक अधिक्षक म्हणून १२वर्षे सेवा झाली असून सांगली जिल्ह्यातील जत,कवठेमंहाकाळ येथे आगार व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.
तर मिरज आगारात सहायक वाहतूक अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने एसटी च्या उत्पन्न वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन महाबळेश्वर आगार अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. आगार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जाधव यांचा कामगार संघटना व प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.