म्हसवड : लांडग्याच्या टोळीने तब्बल 15 शेळ्या- मेंढरांचा जागीच ठार करुन फडशा पाडल्याची धक्कादायक घटना येथील शिंदे वस्ती शेतशिवारात आज पहाटेच्या सुमारास घडली.
म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरानजिकच काल सायंकाळी बंदीस्थ जाळीदार लोखंडी पट्यांच्या पांगरीत नेहमीप्रमाणेच 12 मेंढ्या व तीन शेळ्या सुरक्षित कोंडून ठेवल्या होत्या.
काल रात्री रिमझिम पावसाने सुरवात केली व त्यानंतर विजपुरवठाही खंडीत झाल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले याच संधीचा फायदा घेऊन तीन लांगग्यानी या बंदीस्थ पांगरीत खालुन प्रवेश करुन त्यामधील एका पाठोपाठ अशा 12 मेंढ्या व तीन शेळ्या ठार करुन त्यांचा फडशा पाडला.
एकाच वेळी तब्बल 12 मेंढरे व तीन शेळ्या लांडग्यांना ठार करण्याची हि या परिसरातील घटना पहिलीच आहे. या घटनेची पुसटशी देखील कल्पना घरात झोपी गेलेल्या धनाजी शिंदे यांच्यासह त्यांच्या घरालगत असलेल्या इतर कुटुंबानाही आली नाही.
आज सकाळी धनाजी शिंदे हे घराबाहेर आले असता त्यांना जागोजागी मेंढरे व शेळ्या जागोजागी फाडलेल्या मृत अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेनंतर त्यांनी परिसरात पाहणी केली असता या घटनास्थळाच्या लगतच्या शेतात तीन लांडगे पुन्हा या मृत शेळ्या – मेंढ्याकडे येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शेजारी राहत असलेल्या इतर कुटुंबाना हाका मारुन बोलाऊन घेतले व सर्वांनी मिळून या लांडग्याच्या टोळीस दूर हुसकाऊन लावण्यात यश मिळविले.
धनाजी शिंदे यांची अल्पशी शेती असुन त्यांनी शेळ्या मेंढ्या पालनावर आपल्या कुटुंबाचा निर्वाह करीत आहेत. लांडग्याच्या टोळीने त्यांच्या सर्वच शेळ्या-मेंढ्या जागीच ठार केल्यामुळे त्यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान तर झालेच याबरोबर कुटुंबाच्या खर्चाचा आधारही संपुष्ठात आला.
या घटनेची माहिती मिळताच स्थळी म्हसवड येथील वनरक्षक मनिषा केंद्रे , म्हसवड महसुल मंडल निरीक्षक ऊत्तम अखडमल, येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रमोद गावडे यांनी भेट दिली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.
यापुर्वीही माण तालुक्यातील विरळी व लाडेवाडी येथे लांडग्याच्या हल्ल्यात शेळ्या-मेंढ्या ठार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. वनविभागाने म्हसवड परिसरातील मानवी। वस्तीवर भटकंती करीत असलेल्या लांडग्याच्या टोळीचा सुरक्षित स्थळी बंदोबस्त करावा
धनाजी शिंदे यांच्या कुटुबांचे लांडग्याने केलेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर त्यांना योग्य ती नुकसान भरपाई तातडीने देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी अशी मागणी डॉ.प्रमोद गावडे यांनी उपस्थितांसमोर केली.
धनाजी शिंदे यांच्या शेळ्या-मेंढ्या ठार करुन जे नुकसान लांग्यानी केले आहे त्याबाबत पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने वरिषठाकडे पाठविणार असुन शक्यतो अल्पावधीत त्यांना मदत मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही वन रक्षक मनिषा केंद्रे यांनी यावेळी दिली.