सातारा : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात चर्चेत आहे. महिलांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे मागितली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी फॉर्म भरण्यात महिला भगिनींना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
काही अटींमुळे महिला योजनेपासून वंचित राहातील असे आढळल्यानंतर त्या देखील रद्द करण्याचे आदेश अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. महिलांना सहज आणि सुलभ अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. गरजू आणि योग्य लाभार्थींपर्यंत योजना पोहचावी यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. सातार जिल्ह्यात मात्र अभिनव उपक्रम यला मिळाला आहे.
शेताच्या बांधावर जाऊन लाडकी बहीणचे अर्ज भरले
सध्या पेरणीचे दिवस आहे, त्यामुळे महिला दिवसभर शेती कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या बांधावर जाऊन अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सातारा जिल्ह्यात राबवली जात आहे. सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी आणि शेताच्या बांधावर जाताना दिसत आहेत.
लाडकी बहीण योजना यशस्वितेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे. महिलांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहचवून तिथेच त्यांचा अर्ज भरुन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सातारा जिल्ह्यात सुरु आहेत. अशा पद्धतीने इतरही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींपर्यंत सरकार पोहचावे अशीही मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यातील शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका महिलांना लाडकी बहीण योजनेची माहिती समजावून सांगताना
केव्हा मिळणार लाडकी बहिणीला पहिला हप्ता
1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. पण, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.