महाबळेश्वर: दि.३१( राहील वारुणकर ): महाबळेश्वर येथिल वेण्णा लेक येथे घोड्याचा व्यवसाय करणारे आयुब महामुद वारुणकर हे आपले काम संपवून मुलगा व घोड्या सोबत घरी निघाले असता वेण्णा लेक नगरपालिका पार्किंगच्या बाहेर पडताना उजव्या बाजूस असणाऱ्या पथदिव्याच्या खांबाला स्पर्श झाल्याने घोडा खांबाला चिकटला व विजेचा जोरदार धक्का बसल्याने जागेवरच गतप्राण झाला. सुदैवाने घोडामालक व त्यांचा मुलगा या अपघातातून बचावले.दरम्यान शहरात मुसळधार अवकाळी पाऊस झाल्याने वेण्णा लेक परिसरा मध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते व त्या वेळी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.आयुब वारूणकर व त्यांचा मुलगा हा अंधार झाल्याने घराकडे निघाले होते. ते सदर पथदिव्याच्या पोल जवळ आले असतानाच वीजप्रवाह पूर्ववत झाला. व क्षणात हा अपघात घडला. सुदैवाने मनुष्यहानी टळली असली तरी गरीब परिस्थिती असलेल्या आयुब वारूनकर यांचे उपजीविकेचे साधन मात्र गेल्याने सर्व स्तरातून हळ हळ व्यक्त होत आहे. तसेच नगरपालिकेचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.