सातारा/अनिल वीर : महात्मा जोतीराव फुले यांचे क्रांतिकारक विचार आणि कार्य आजच्या समाजाला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. शोषण विरोधी चळवळींचा उगम त्यांच्या विचाराधारेतून झालेला आहे. तेव्हा आज सत्यशोधक विचारांची गरज आहे.असे विचार प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘भारताचा अमृत काल’ या विषय सूत्रावर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ‘महात्मा फुलेंच्या स्वप्नातील भारत व सत्यशोधक समाज’ या विषयावरील पुष्प गुंफताना प्राचार्य मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले,”महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आदी ग्रंथाद्वारे तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना करुन शोषित बहुजन समाजाला जागे केले.राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी समाज सुधारक- विचारवंत यांनी महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवला. म.फुले यांचे क्रांतिकारक विचार व पुरोगामी चळवळ आज नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रतिगामी विचारधारा सर्वच क्षेत्राला प्रभाशाली ठरत आहे. म.फुले यांच्या कार्याचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की, शेतकरी व स्त्रीमुक्तीची चळवळ यांच्या विचाराचा उगम महात्मा फुले यांच्या विचारात झालेला आहे. शिक्षण विस्ताराचा मूळ गाभा देखील त्यांच्या विचारात आहे. शिक्षण क्षेत्रच उध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. हा धोका लक्षात घेऊन महात्मा फुले यांचा सत्यशोधकी पुरोगामी विचार तरुण पिढी पुढे ठेवण्याची नितांत गरज आहे.” प्रा.सुनील गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या वाङ्मयाचे मर्म आणि विश्लेषण उत्तम प्रकारे विषद केले. प्राचार्य डॉ .संजय कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची तुलना चार्वाक,महात्मा बसवेश्वर व बुद्ध यांच्या वारसा सांगणारी असल्याचे सांगितले. अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा व कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात आलेली क्रांतिकारक आचारसंहिता या सभेत सादर करून त्याचे महत्व विशद केले.कोषाध्यक्ष केशवराव कदम यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.