उंब्रज – खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर वायर ओढताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी ही घटना घडली.
ऋषिकेश प्रकाश कांबळे (वय २६) (रा. केसे पाडळी, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संजय रामचंद्र वीर (वय ५१), अमित महादेव कारंडे (वय ३०, दोघे रा. केसे पाडळी, ता. कराड), तन्मय रविंद्र अडकळ (वय २४, रा. अढूळ ता. पाटण) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खालकरवाडीच्या डोंगरात देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर वायर ओढण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक ऋषिकेश कांबळे याला जोराचा शॉक लागला. यामध्ये तो गंभीररित्या भाजून जखमी झाला. यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य कर्मचा-यांनी गंभीर जखमी कांबळे तसेच अन्य तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी ऋषिकेश कांबळे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक व्ही. डी. डांगरे करत आहेत.