सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपचे सध्या दोन आमदार आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि माण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले तर माणमधून जयकुमार गोरे आमदार आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीत ही जागा कुणाकडे जाणार याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापैकी एका पक्षाला ही जागा मिळू शकते अशा चर्चा आहेत. साताऱ्यात मविआमध्ये दीपक पवार, अमित कदम आणि सेनेच्या सचिन मोहितेंच्या नावाची चर्चा आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले 2004 निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामध्ये सातारा शहर, जावळी तालुक्यतील गावं आणि सातारा जिल्हा परिषदेचे शेंद्रे आणि परळी हे दोन गट मिळून सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. शिवेंद्रराजे भोसले यांनी 2009,2014 आणि 2019 मध्ये या मतदारसंघात विजय मिळवला आहे. पहिल्या तीन निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर देखील ते विजयी झाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील शिवेंद्रराजे भोसले भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट आहे.
शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यानं 2019 च्या निवडणुकीवेळी दीपक पवार यांना पक्षात प्रवेश देत राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली. दीपक पवार यांनी त्यापूर्वी भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी पक्षांतर केल्यानं उमेदवारी मिळणार नाही हे कळताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देखील दीपक पवार पराभूत झाले होते. 2009 ला शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरुद्ध भाजपकडून नरेंद्र पाटील यांनी निवडणूक लढवली होती.
मविआकडून उमेदवार कोण?
महाविकास आघाडीत ही जागा कुणाकडे जाणार हे स्पष्ट झालेलं नाही. 2019 ची निवडणूक लढवणारे दीपक पवार इच्छुक आहेत. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांच्या पक्षात सक्रीय झालेले अमित कदम देखील विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. याशिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन मोहिते हे देखील तयारी करत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत जागा कुणाकडे जाणार हे स्पष्ट झाल्यानं उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होईल.
शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले एकत्र
साताऱ्यातील राजघराण्यातील सत्तासंघर्ष अनेक वर्ष सातारकरांनी पाहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी यापुढं राजकीय संघर्ष होणार नाही,असा शब्द त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आल्याचा देखील विधानसभा निवडणुकीत फायदा होणार आहे. कराड दक्षिणकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हॅटट्रिकची संधी, भाजप अतुल भोसलेंना उतरवणार? विधानसभेची खडाजंगी: साताऱ्यात लोकसभेला महायुतीची सरशी, महाविकास आघाडीला तगडी फाईट द्यावी लागणार, जाणून घ्या आमदारांची यादी