*सैदापूर ग्रामपंचायत निविदा प्रकरणाचा सावळा गोंधळ* 

0

*घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी ग्रामसेविकेने अवलंबला रजेवर जाण्याचा मार्ग* 

सातारा,दि. 19: शहरापासून हाकेच्या अंतरावरच असणाऱ्या सैदापूर ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आला  असून ग्रामपंचायतीतील निविदा प्रकरणाचा सावळा गोंधळ व घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी ग्रामसेविकेने रजेवर जाण्याचा मार्ग अवलंबल्याची चर्चा सैदापूर परिसरात होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैदापूर ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी दि.  9 डिसेंबर 2022 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसारित करण्यात आली. या प्रसिद्ध निविदेचा स्वीकृतीचा कालावधी सुट्टी वगळून दोन दिवसांचा ठेवून नियमांची पायमल्ली करीत बेकायदेशीररित्या निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रकार सरपंच, सदस्य व ग्रामसेविकेने केला आहे. त्यात भरीस भर म्हणजे निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मंजुरीशिवाय संबंधित कामाचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा प्रकार घडला असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. निविदा प्रसिद्ध झालेल्या कालावधीत काम मागणीचा अर्ज करूनही काही कंत्राटदारांना अंदाजपत्रकाची प्रत देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. याशिवाय  “कंत्राट मॅनेज असल्याचा” गौप्यस्फोट स्वतः ग्रामसेवकांनीच केला आहे. याबाबतचा तक्रारी अर्जही ग्रामपंचायतीच्या जबाबदार घटकांकडून ग्रामसेविकेसमोरच फाडण्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे स्टिंग ऑपरेशन सुरू असताना ग्रामसेविकेची जीभ पुन्हा घसरली व सरपंचांकडे संपर्क करण्याचा गोपनीय सल्लाही त्यांनी दिला. याबाबत ज्या पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्या पत्रकारांना अडवून एका ग्रामपंचायत सदस्याने व महिला सरपंचांच्या पतीने हा प्रकार दडपण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा अनेकदा केला आहे पत्रकारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता याबाबतची माहिती  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबतची विचारणा करून सात दिवसात अहवालाची मागणी करू, अशी ग्वाही दिली होती. परंतु सात दिवसानंतरही या प्रकरणाचे नेमके झाले काय याचा सुगावा लागला नाही. उलट स्वतःला वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडून बेकायदेशीर कागदपत्रांच्या हालचाली झाल्याचेही निदर्शनास आले आहे .

 महिला सरपंचांना कामाबाबत पूर्ण माहिती नसल्याने त्यांचे पतीच सर्व काही उचापती करत असल्याचेही अनेकांचे मत आहे. ग्रामसेवक यांनी या प्रकरणापासून वाचण्यासाठी तर रजेचा मार्ग स्वीकारला नाही ना? अशी चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याबाबतचे तोंडी आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे  याप्रकरणात वरिष्ठ अधिकारी नेमके काय करणार याची सैदापूर परिसरात मोठी उत्सुकता आहे.

*चौकट* 

 *चौकशी अधिकाऱ्यासमोर सरपंच पतीची लुडबूड

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री निकम यांना सैदापूर ग्रामपंचायत मध्ये पाठवले असता सरपंच महिलेचे पती व ग्रामसेविका यांनी सामोरे जात सोमवारी सायंकाळपर्यंत काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, असे खात्रीशीर वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here