जागतिक मौखिक आरोग्य दिन २० मार्च २०२५ चे औचित्य साधून मौखिक आरोग्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप:- मौखिक आरोग्य म्हणजे दात, हिरड्या, सभोवतालचे परिवेष्टन, जीभ, लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी, घसा इत्यादी संदर्भातील आरोग्य होय. वरील भागांची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांचे आरोग्य उत्तम राखले जाऊन सर्वसाधारण आरोग्याचेही रक्षण होते. मौखिक आरोग्याचे महत्त्वाचे घटक म्हणजे दातांचे आरोग्य व हिरड्यांचे आरोग्य
दातांचे आरोग्य:-
सर्वसाधारणपणे ६० ते ९०% शाळकरी मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण आढळून येते. खाण्याचे अनियमित सवयी, गोड व चिकट पदार्थांचे अधिक सेवन, मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष त्यामुळे सर्वसाधारण जनतेमध्ये दात किडण्याचे प्रमाण अधिक आढळून येते.
दात कसे किडतात:-
दातांवर बसलेला अन्नकन्नाचा थर (प्लाक) ज्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते व तोंडातील सूक्ष्मजंतू यांचा संयोग होऊन लॅक्टिक आम्ल तयार होते त्या लॅक्टिक आम्लामुळे दातांचे (इन्यामल) वरील कठीण आवरणाला छिद्र पडून दात किडणे सुरू होते. वेळीच उपचार करून ही कीड थांबवली नाही तर पुढे डेन्टीन आणि पल्प पर्यंत जाऊन दात प्रचंड दुखू लागतो.
हिरड्यांचे आरोग्य:-
भारतामध्ये सर्वसाधारणपणे ९० ते ९५ टक्के लोकांमध्ये हिरड्यांचे आजार आढळून येतात. दात आणि हिरड्यांच्या मध्ये इंग्रजी व्ही आकाराची फट असते. ज्यास सल्कस असे म्हणतात. या सल्कस मध्ये अन्नकणांचा थर जमा होऊन तेथे प्लाक ची निर्मिती होते. प्लाक मधील जिवाणू जंतूविष निर्माण करतात ज्यामुळे हिरड्यांना हानी पोहोचते. ज्यामुळे दात आणि त्यास आधार देणाऱ्या उती मधील बंधन कमकुवत होते व हिरड्या लालसर होतात फुगतात, हिरड्यांमधून रक्त येते याला जिंजीव्हायटीस असे म्हणतात. जिंजीव्हायटीस वाढून जेव्हा अधिक गंभीर हानिकारक स्वरूप धारण करतो यामध्ये हिरड्या जागा सोडतात (दातांच्या मुळाकडे सरकतात), दोन दातामधील हाडांची झीज होते व कायमस्वरूपी दात सैल होतात याला पेरीओडोंटायटिस (पायरिया) असे म्हणतात.
उच्च रक्तदाब निवारक, अपस्मार निवारक औषधे, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन, मधुमेही रुग्ण, तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या, दातामधील फटी वाकडे-तिकडे दात या कारणामुळे हिरड्यांचे आजार होण्याचा धोका जास्त असतो.
तुमचे दात व हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय:-
१.दररोज तुमच्या दातांची योग्य निगा राखण्याने व नियमित दातांची तपासणी करून घेण्याने तुम्ही दात व हिरड्यांच्या आजारापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
२.तुमचे दात दिवसातून दोन वेळा व्यवस्थित ब्रशने स्वच्छ करा यामुळे तुमच्या दातावरील जिवाणूंचा थर निघून जाईल, चांगल्या स्थितीत असणारा मऊ टूथब्रश चा वापर करा.
३.फ्लुराईड असणारे टूथपेस्ट व माऊथ रिंसेसचा वापर केल्याने दातांना मजबूती येते व दात किडण्यापासून बचाव करता येतो.
दातांच्या मधला भाग दररोज स्वच्छ करा. फ्लॉस किंवा अंतरदंत्य स्वच्छक ( इंटर डेंटल क्लीनर) च्या मदतीने दोन दातांच्या मधला भाग दररोज स्वच्छ करण्याने दातांच्या मधल्या भागातील जिवाणू आणि अन्न कण काढून टाकता येतात, जिथे ब्रश पोचू शकत नाही.
४.संतुलित आहार घ्या.
५.दोन जेवणांच्या मध्ये इतर अन्नपदार्थ खाण्यावर मर्यादा ठेवा.
६.तुमच्या दंतवैद्याकडून नियमित दातांची तपासणी करून घ्या.
मुख कर्करोग निदान:- मुख कर्करोग निदान हा मौखिक आरोग्य तपासणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुख कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय:-
१.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळा.
२.सुरुवातीच्या मुख कर्करोग निदानासाठी संपूर्ण मुख तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
३.तोंडामध्ये कुठे सफेद चट्टा,लाल चट्टा, व्रण फायब्रोसिस आहे का? याची तपासणी करून घ्यावी. पूर्व मूख कर्करोगाचे निदान होऊन त्यावर वेळीच उपचार घेतल्यास पुढे मुख कर्करोग या भयानक व्याधी पासून रक्षण होऊ शकते.
चला तर मग…….
आ……. म्हणा मुखस्वाथ्याची काळजी घ्या, मुखारोग्यासाठी एकत्र या. “स्वास्थ्य मुख तरच स्वास्थ्य काया”. “आनंदी मुख आनंदी मन”
लेखक – डॉ. संतोष प्रकाश झापकर.दंतशल्य चिकित्सक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण.