अकोला : शहरातील केशवनगर परिसरातील रिंगरोड वरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून मशीनमधील १६ लाख ५४ हजार रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी पहाटेच्या सुमारास समोर आला आहे. या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी या मशीनमध्ये १६ लाख रुपये भरण्यात आले होते.
रिंगरोड वरील भारतीय स्टेट बँकेचे ‘एटीएम’ मशिन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १६ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मध्यरात्री केव्हा तरी ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
अकोला शहरातील केशवनगर परीसरात असलेल्या रिंगरोडवर काही वर्षांपासून स्टेट बँकेचे एटीएम मशिन आहे. त्याच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक नियुक्त केलेला नाही. ४ जानेवारीच्या मध्यरात्री नंतर चारचाकी वाहनातून काही चोरटे आले व त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चक्क ‘एटीएम’ तोडफोड करून त्यातील १६ लाख ५४ हजार रुपये चोरून पोबारा केला.
ही चोरी झाल्याचे आज पहाटे लक्षात येताच, पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राउत, खदान पोलीस तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. चोरांचा माग काढण्यासाठी श्वानाला पाचारण करण्यात आले होते. गॅस कटरचा वापर केल्यामुळे श्वानाला चोरट्यांचा कोणताही मार्ग दाखवता आला नाही. दरम्यान, ठसे तज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत. शिवाय पोलिसांकडून एटीएम केंद्राच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. चित्रीकरणाची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.