देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी शहरातील एका शाळेमध्ये शाळेतील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या वासनांध शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याच्यावर राहुरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तातडीने अटक केली आहे. याबाबत काल सोमवार दि.७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून सदर पीडीतीचे दोन मुली व एक मुलगा या शाळेत शिक्षण घेत आहे. यातील मुलाने व एका मुलीने सदर महिलेस फोन करून सांगितले की, शाळेतील खांडवे हे आमच्याशी वाईट वागतात तू मला भेटायला ये. म्हणून पीडित मुलीची आई ही काल सोमवारी राहुरी येथे मुलांना भेटण्यासाठी आली असता मुलांनी व मुलींनी त्यांच्यावर घडलेली आपबीती सांगितली.
शाळेतील गणेश तुकाराम खांडवे सर हे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व दुपारी १ वाजता एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला म्हणाले की,तुझा हात माझ्या हातात दिल्यावर चांगलं वाटतं तसेच दुपारी १ वाजेच्या सुमारास सरांना नवीन वही मागितली तेव्हा सर तिला म्हणाले की, तू मला पप्पी दे तरच मी तुला वही देईल. सदर सर्व घटना मुलगी आपल्या आईला सांगत असताना शाळेतील इतरही मुली तिच्याजवळ जमा झाल्या व दुसऱ्या एका चौथीच्या वर्गातील मुलीने देखील तिच्यावर सरांनी कसे वाईट वागतात व हात धरून नको त्या ठिकाणी लावतात असे सांगितले.
तर एका मुलीने सर तिला मोबाइल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखविलेचे सांगितले तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलीच्या आईने राहरी पोलीस स्टेशन गाठत आरोपी गणेश तुकाराम खांडवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे करत आहेत.