देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दवणगाव रोडवरील रहिवासी असलेल्या जागृती शिंदे या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. मात्र तिच्या आई व नातेवाईकांनी आज शनिवार दि. १५ जून रोजी राहुरी पोलिसात हजर होऊन आमच्या मुलीला देवळाली प्रवरा भागातील टवाळखोर तरुणांनी त्रास देत व पाठलाग करत छेडछाड केल्याचे पोलिसात कैफियत मांडली असल्याची माहिती समजली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत मयत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईक व कुटुंबीयांची पोलीस चौकशी करत होते मात्र सायंकाळ पर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे.
सतरा वर्षीय जागृती शिंदे या अल्पवयीन विद्यार्थीनीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याने राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. आता, मात्र या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून आज मयत मुलीच्या आई व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दाखल होत पोलीस अधिकाऱ्यासमोर मुलीला त्रास होत असल्याचे सांगितल्याने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.त्रास देणाऱ्या टोळक्यातील काही तरुणांना मयत मुलीच्या आईने काही दिवसापूर्वी जाऊन माझ्या मुलीला त्रास देऊ नका अशी समज दिली असल्याचे बोलले जात आहे.मात्र तरीही त्या मुलीला त्रास होत असल्याचे मुलीच्या नातेवाईकांकडुन सांगण्यात आले आहे.
काल सायंकाळ पर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात त्या मुलीचे नातेवाईक बसून होते व पोलीसांची या संदर्भात चौकशी सुरु होती. पोलीस प्रशासन याबाबत काय गुन्हा दाखल करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.