वाठार स्टेशन – कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे 6 मार्च 2022 रोजी एकतर्फी प्रेमातून एका युवतीचा खून करणाऱ्या निखिल राजेंद्र कुंभार (वय 26) याला सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे.
पिंपोडे बुद्रुक येथील पंचम क्लासेसमध्ये सकाळी 9:15 वाजता निखिलने पीडित युवतीवर चाकूने हल्ला केला. ती अभ्यास करत असताना त्याने तिच्या पोटात आणि पायावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची फिर्याद वाठार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. तत्कालीन सपोनि एस.एस. बोंबले यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. कोसमकर यांच्यासमोर हा खटला चालला. सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी 13 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचे दाखले सादर करून पुरावे ग्राह्य धरले गेले.
11 एप्रिल 2025 रोजी न्यायालयाने निखिलला भा.द.वि. 302 अंतर्गत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंड, तसेच भा.द.वि. 450 अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेच्या पालकांना देण्याचे निर्देश देण्यात आले.
या खटल्यात पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी प्रकाश मेळावणे यांनी काम पाहिले. पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडमधील उपनिरीक्षक सुनिल सावंत, शशीकांत गोळे, अरविंद बांदल, गजानन फरांदे, रहिनाबी शेख आणि अमित भरते यांनी सहकार्य केले.