देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
सुमारे एक महिन्या पूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक येथील नागपाल यांच्या कापड दुकान समोरील ओट्यावरुन रेडिमेड कपड्यांचा बाॅक्स चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्यातील आरोपीच्या राहुरी पोलिस पथकाने ठाणे येथे मुसक्या आवळून ताब्यात घेतले. राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरात सुधीर हरजीत नागपाल यांचे राजेश गारमेंट नावाचे रेडीमेड कापडाचे दुकान आहे. दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान नागपाल यांच्या दुकानात ७५ हजार रुपए किंमतीचे रेडीमेड कपड्यांचा बाॅक्स आला होता. तेव्हा नागपाल यांनी तो बाॅक्स दुकानाच्या ओट्यावर ठेवला होता. तेव्हा एक भामटा आला आणि कपड्याच्या बाॅक्स जवळच बसला. त्याच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून त्या भामट्याने सदर कपड्याचा बाॅक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या एका रिक्षात नेऊन ठेवला. आणि तो देखील रिक्षात बसून तो शिवाजी चौक ते शनीचौक मार्गे पसार झाला होता. सुधीर हरजीत नागपाल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या नंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपीचा सुगावा लागताच पोलिस पथकाने ठाणे येथील अंबरनाथ येथे जाऊन आरोपी रवी राजू अरकेरी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
सदर आरोपी रवी राजू अरकेरी याला जेरबंद करण्यात आले असुन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मुद्देमाल जप्त करण्याचे काम पोलिस पथकाकडून सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व हवालदार संदिप ठाणगे हे करीत आहे.