उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार Gambling खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर उरण पोलिसांनी अचानकपणे धाड टाकली.या धाडीत पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख ४८ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
नवरात्रीच्या उत्सवात उरण तालुक्यातील कळंबूसरे गावात जुगाराचा डाव चालत असल्याची कुणकुण उरण पोलिसांना लागली होती.खात्रीशीर माहिती मिळताच उरण पोलिसांनी वपोनि सतीश निकम यांनी आपले सहकारी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कांबळे,सपोनि गणेश शिंदे यांच्या मदतीने सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली.या धाडीत एका अंगणात तीन पत्याचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांना शिताफीने पकडून अटक केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये संतोष वामन राऊत, देवेंद्र महादेव पाटील, धर्मेंद्र राघव ठाकूर, संतोष चंद्रकांत गावंड, दिलिप हरी पाटील,सागर शंकर म्हात्रे, विनायक जगदीश गावंड, विश्वनाथ नामदेव पाटील, संतोष नारायण ठाकूर, हिम्मत रामदास केणी, संजय बाबुराव गायकर, समाधान जयराम ठाकूर,दिपक विष्णू चव्हाण आदींचा समावेश आहे.त्यांच्याकडून एक लाख ४८ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.