कोरेगाव : येथील भूमिअभिलेख तथा मोजणी कार्यालयातील भूकरमापक संतोष रामचंद्र पुजारी यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. कोरेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात मुळातच मोजणी, तसेच इतर मोजणीविषयक कामांचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे.
दुसऱ्या बाजूने त्या कामांच्या तुलनेत अधिकारी व कर्मचारी संख्या कमी आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी हे आपल्या कामात नेहमी चुकारपणा अथवा आळसपणा करतात, अशा प्रकारच्या सर्रास तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्यात साधी, अतिजलद मोजणी करून देणे, मोजणी केल्यावर हद्दी दाखवणे, मोजणी नकाशे देणे, नक्कल काढणे, नकाशा काढणे आदी अनेक कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
मध्यंतरी तर एका नागरिकाने आपल्या कामात दिरंगाई होत असल्याचा समज करून घेऊन कार्यालय प्रमुख तथा उपअधीक्षकांच्या अंगावर अक्षरशः डिझेल टाकले. मात्र, पुढील अनर्थ टळला. याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. अशा अनेक तक्रारींची दखल घेत भूमिअभिलेख विभागाचे सातारा जिल्हा अधीक्षक वसंत निकम यांनी कोरेगाव कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी कार्यालयातील कामकाजाची चौकशी सुरू केली होती.
या चौकशीत कार्यालयातील भूकरमापक पुजारी यांनी नागरिकांच्या बऱ्याच मोजण्या केल्या होत्या. मात्र, त्यांची प्रकरणे कार्यालयात जमा केली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यामुळे श्री. निकम यांनी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी पुजारी यांची विभागीय चौकशी लावली होती.
या चौकशीत पुजारी यांनी तब्बल ६७ मोजणीची प्रकरणे कार्यालयात जमा केली नसल्याचे आढळून आल्याने अखेर त्यांना १८ डिसेंबर २०२४ रोजी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निर्वाह भत्ता प्राप्तीसाठी सांगोला (जि. सोलापूर) येथील भूमिअभिलेख कार्यालय देण्यात आले आहे, असे श्री. निकम यांनी सांगितले.
नागरिकांनी सहकार्य करावे
कोरेगाव भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणी व त्या अनुषंगाने इतर कामांचा ओघ मोठा आहे. नागरिकांच्या कामांचा निपटारा करण्याचा प्रयत्न अधिकारी आणि कर्मचारी कसोशीने करत आहेत. मात्र, काही कर्मचारी कामचुकार आहेत. त्यांना सुधारण्याची संधीही देण्यात येत आहे. त्यामधून अपेक्षित अशी सुधारणा न झाल्यास संबंधितांवर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही आपले काम करून घेताना अडचणी वगैरे बाबी समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. निकम यांनी माध्यमा समोर बोलताना केले आहे.