खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

0

भुईंज : खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संतोष बाळासाहेब चव्हाण (वय 34), अक्षय दत्तात्रय शितोळे (वय 26), योगेश आनंदा वाळुंज (वय 25, तिघे रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) आणि सिद्धांत यशवंत कांबळे (वय 31, रा. निमोने, ता. शिरुर, जि.
पुणे) यांना भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.

भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार मंगळवारी (दि. 11) रात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत करुणा मंदिरासमोर महामार्गाच्या पूर्वेला झाडीमध्ये अंधारात पाच जण त्यांच्या दुचाकी बाजूला लावून बसले असून, ते महामार्गावरुन जाणार्‍या लक्झरी बसेस लुटणार आहेत, अशी माहिती गर्जे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती दिली. त्यानंतर गर्जे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी सापळा लावून, रात्री 9.30 च्या सुमारास चा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्यांचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता, खंबाटकी घाटात लक्झरी बसेस अडवून, प्रवाशांचे दागिने व पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबल्याची कबुली त्यांनी दिली. संशयितांकडून एक सुरा, दोन लोखंडी रॉड, मिरचीची पूड असलेली प्लॅस्टिकची पिशवी, मोबाइल आणि दोन मोटारसायकली, असा दोन लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here