भुईंज : सुरूर (ता. वाई) परिसरात अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी करणाऱ्या एकाला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३३ सेमी लांबीचे मांजरीही जप्त केले आहे.दीपक श्रीरंग मोहिते (वय ४४, रा. वहागाव, ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने सापळा रचला. सुरूर हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दीपक मोहितेला ताब्यात घेतले असता त्याच्याकडील गुलाबी रंगाच्या पॉलिथिनच्या पोत्यामध्ये १३३ सेमी लांबीचे दुर्मिळ प्राणी खवल्या मांजर मिळून आले.
त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने ते वहागाव (ता. वाई) हद्दीतील डोंगरामध्ये पकडून त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार भुईंजचे वनपाल यांच्याकडून खात्री करून गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलिस अंमलदार अतिश घाडगे, अजित कर्णे,शिवाजी भिसे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, सचिन ससाणे, प्रवीण पवार, दलजित जगदाळे तसेच वन विभागातील वनपाल दिलीप व्हनमाने, वर्षाराणी चौरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख, डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.