सातारा : माण तालुक्यातील वडकुटे मलवडी येथील अण्णा धुळा वाघमोडे (वय-७०) यांचा खून केल्याप्रकरणी बापलेकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
मारुती धुळा वाघमोडे (वय-६०) व आबासो मारुती वाघमोडे (वय-३५) यांना शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती वाघमोडे यांचे भाऊ अण्णा वाघमोडे हे ज्वारीच्या पिकाला पाणी देण्याकरता गेले होते. त्यावेळी मारुती वाघमोडे व आबासो वाघमोडे यांनी ‘आम्हाला शेतातून पाणी नेऊ दे’, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून दोघांनी कुऱ्हाड, दगड व काठीने मारहाण करून अण्णा यांचा दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खून केला. याबाबतची तक्रार अण्णा वाघमोडे यांच्या मुलाने म्हसवड पोलिस ठाण्यात दिली, सपोनि बाजीराव ढेकळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
तसेच वैद्यकीय पुरावे जमा करून आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित कदम यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची जाब जबाब, कागदपत्रे पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
हा खटला चालवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विन शेंडगे, सपोनि सखाराम बिराजदार यांनी मार्गदर्शन केले तर पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, विजयलक्ष्मी दडस, आमिर शिकलगार, जयवंत शिंदे, दया खाडे यांनी सहकार्य केले.